Thursday, April 26, 2007

जगणे म्हणजे उधळित जाणे

जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

घनधारांतुन ख्याल ऐकतो रंगुनि मल्हाराचा
बघता बघता मोरपिसारा सार्या संसाराचा
मनात पाउस बरसे उधळित मातीचा मधुगंध
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

दुःखाला आधार नको का? तेहि कधितरी येते
दोस्त हौनी हातच माझा अपुल्या हाती घेते
जो जो येइल त्याचे स्वागत दार न कधिही बंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधि चंद्र होऊनी हासे
सर्वत्रच तो बघतो धुंदी डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

कधी कुणाचे आसू पुसता बोतंनी हळुवार
हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

Wednesday, April 18, 2007

खाली डोकं, वर पाय

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेबोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? ॥ १ ॥

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? ॥ २ ॥

भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील काय रे तीनदा? ॥ ३ ॥

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? ॥ ४ ॥

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


तुझी हाक तळ्यावरुन येते;
वाऱ्याच्या मळ्यावरुन येते;

थरारुन ऍकणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


मातीच्या ऒल्या ऒल्या वासात;
वाऱ्याच्या खॊल खॊल श्वासात;

झाडांचं भीजणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


फुलांचे वास वीरुन जातात;
दीलेले श्वास सरुन जातात;

असण्यांइतकचं नसणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे

मी न घेतले, तरि मिळाले

मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये.

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती.
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

धूर...

अवतीभवती सतत जे घडतं आहे
त्याला वास्तव म्हणतात ;
ते बघून आपल्या आत जे घडतं
त्याला विस्तव म्हणतात !

विस्तव जर बाहेर पेटू शकला ,
तर निदान तो जाळून टाकील
बाहेरच्या वास्तवाची थोडीतरी घाण ;
पण विस्तव तर आतच धुमसतोय ,
आपल्यालाच हळूहळू गुदमरून टाकीत !

अशाही धुमसणाऱ्या परिस्थितीत
आपली धडपड
धूर बाहेर दिसू नये म्हणून !
धूर बाहेर दिसला तर
दांड्ग्यांच्या दहशतीचा धोका घेरील !
धूर न दिसू देणं
हेच लक्षण सुसंस्कृत असण्यचं
हे आता सगळ्यांनीच मान्य केलंय !

विस्तव आत धुमसतोय ,
श्वास धुराने घुसमटतोय ,
गुदमरत असताना एकच आशा धीर देतेय :
आतला विस्तव एक दिवस इतक पेतेल
की काही नाही तरी निदान
सुसंस्कृतपण आपलं त्यात जळून जाईल !

मन कावरं बावरं तुझ्या एका श्वासासाठी

मन कावरं बावरं
तुझ्या एका श्वासासाठी!
तुझा एक एक शब्द
माझी गीता माझी पोथी!!

तुझा हुंकार झंकार
जशी सरस्वती वीणा!
तुझ्या वाणीचा गोडवा
वेणू मधुबन कान्हा!!
तूच पाठराखी माझी
तूच माझी आदि शक्ती!
मन कावरं बावरं
तुझ्या एका श्वासासाठी!!


डोळे यातना व्याकुळ
पाणी माझ्या काळजाचं!
वाट दिसता दिसेना
जसं नभ मळभाचं!!
गळपटलेले पाय
शून्य वजाबाकी हाती !
मन कावरं बावरं
तुझ्या एका श्वासासाठी!!

असा यल्गार मांडला
आकांताने फ़ोडी टाहो!
तरारले अश्रू मनी
पान्हा पत्थराला लाहो!!
सारा लिलाव मांडला
होते नव्हते ते गाठी !
मन कावरं बावरं
तुझ्या एका श्वासासाठी !!
मन कावरं बावरं
तुझ्या एका श्वासासाठी!!!

सहज हसुनि पाहतेस

सहज हसुनि पाहतेस , चंद्र उरी जागे !
ह्रदय ह्रदय जोडितात हे रेशिमधागे !!

स्वप्नांनी वेढितेस !
तार तार छेडितेस !!

मधुर मधुर जादुगार सुर हा तुझा गे !
सहज हसुनि पाहतेस , चंद्र उरी जागे !!

चालताच तू समोर !
थबकतात चकित मोर !!

वळुनि वळुनि पुष्पलता पाहतात मागे !
सहज हसुनि पाहतेस , चंद्र उरी जागे !!

सूर असा लागताच !
चंद्र असा जागताच !!

जन्म जन्म दरवळतो कुसुमित अनुरागे !
सहज हसुनि पाहतेस , चंद्र उरी जागे !!

Tuesday, April 17, 2007

सलाम

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.

वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वचाणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

(with special thanks to Gaurav Mahajan)

तुज कधीच नाही कळले...

तुज कधीच नाही कळले, नाही कळले
मी तुझ्याचसाठी किती किती तळमळले!

पण कसे कळावे? तेव्हा अभिमानाने
भांडले,तंडले,फणफणलें क्रोधानें
काटेरी उधळुनी शब्द परतलें मागें
ते घडलें सारे..... सारे अंधपणानें!

पण खरेच नव्हते तसले काहि मनांत
जे होऊनी अग्नी धगधगलें शब्दांत
जातांना भिडली नजर तुझ्या नजरेला
मी व्यथा पाहिली भिजलेली तेजांत!

का खरीच होती माझी तुजवर प्रीत?
कां अशी वागले? कुठली असली रीत?
अपुल्य़ाशी केले मीच समर्थन माझे
अन म्हटले जुळवीन पुन्हा नवीनच गीत

त्या गीताचे पण सूर कधीच न जुळले
मी ज्योत व्यथेची होऊनी जळले, जळले
मी म्हटले विसरुनी जाईन सारे सारे
तुज सांगु कसे रे मलाच मी किती छळले!

वाटले कितीकदा पुन्हा तुजकडे यावे
अन मिठीत तुझिया माझेपण विसरावें
वाटले कितीकदा मिटून अलगद डोळे
रे तुझ्या प्रीतिच्या आवेगांत बुडावे !

ओसरला अवचित कलह मनांतील सारा
अन विरला क्षणी त्या अभिमानाचा पारा
उगवला मनाच्या निर्मळ क्षितिजावरती
कोवळी शुभ्रता शिंपित हसरा तारा !

मी तशीच उठले... होता जरि अंधार...
काढियला अडसर आणि उघडिले दार
का फसविती डोळें? तूच उभा दाराशी...
मी कोसळलें... घेऊन तुझा आधार !

शिर खुपसुनि वक्षीं स्फुंदुनी स्फुंदुनी रडलें,
मी वादळातल्या फुलापरी थरथरलें
" या चरणांपाशी मीच निघालें होतें-"
वाटलें म्हणावें- परंतु शब्द न फुटलें !

ही व्यथा मनींची मौनांतच सांकळली
का असेल तुजला अश्रूंतुन आकळली ?
मी नाही बोललें... नाही जाहला धीर...
वेदना उरींची उरीच रे कळवळली !

अजुनीहि तरी कधी एकांती तळमळते
तळमळतें, जळतें आणि स्वतःशी म्हणते :
तुज कधीच नाही कळले, नाही कळले
माझेपण विसरुनी किती किती तळमळलें !!

यांचं असं का होतं ते कळत नाही...

यांचं असं का होतं ते कळत नाही , किंवा यांना कळतं पण वळत नाही
निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार,
रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार!
त्याचं कौतुक नसतंच मुळी कधी यांच्यासाठी
यांच्यासाठी एकच असते कपाळाला आठी!
कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥१॥

मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होते!
वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो!!
यांचा धोशा सुरू असतो -अमकं खाऊ नका त्याने डोकं जडसं होतं
तमकं पिऊ नका त्याने पडसं होतं
कधीसुद्द्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥२॥


सगळे कसे बागेत व्यायाम करत बसणार?
किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार?
बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना!
गालाला गाल लावून गुलगुल करत असतंच ना!
असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच,
यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं,
पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं!!
या कूट कोड्याचं उत्तर कधीच सुटत नाही, यांचं असं का होतं कळत नाही॥३॥

कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच जागा ठरलेली, आणखी कुठे जाणार?!
कारण आणि परिणाम यांचं नातं ढळत नाही,
यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळत पण वळत नाही ॥४॥

गन्धातून गूढ उकलते

ते किती लपवले तरिही
मज नकळत कळते कळते!
पाकळ्यात दडले तरिही
गन्धातून गूढ उकलते!!

मातीत गाढ निजलेले
जरि बीज न नयना दिसते!
घन वळता आषाढाचे
मज नवखी चाहूल येते!!

रात्रीच्या घन अन्धारी
जरि गहनच सगळे असते!
ते निःशब्दाचे कोडे
मज नक्शत्रान्तून सुटते!!

श्रावणात चित्रलिपीचे
जरि अर्थ न कळति पुरते!
तरि ऋतुचक्रापलिकडचे
प्राणात उमलते नाते!!

लहरीन्तून थरथरणार्या
जरि भुलवित फ़सवित पळते!
पावसात उत्तररात्री
मज अवचित लय उलगडते!!

प्रतिबिम्बच अस्फ़ुट नुसते
जरि शब्दातुन भिरभिरते!
मौनात परि ह्रदयीच्या
कधी पहाट होऊनी येते!!

दुरात पलीकडे जेव्हा
ह्ळू गगन धरेला मिळते!
ते अदभूत मज कळल्याची
वेदनाच नुसती उरते!!

ते किती लपवले तरिही
मज नकळत कळते कळते!
पाकळ्यात दडले तरिही
गन्धातून गूढ उकलते!!

मी फूल तृणांतिल इवलें

जरि तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही!
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं!!

शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे!
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें!!

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें!
अन् स्वत:स विसरुन वारा
जोडील रेशमी नातें!!

कुरवाळित येतिल मजला
श्रावणांतल्या जळधारा!
सळसळून भिजलीं पानें
मज करितिल सजल इषारा!!

रे तुझियां सामर्थ्यानें
मीं कसें मला विसरावें?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें?

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा!
उधळित स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होऊनि ये तूं!
कधिं भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू!!

तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यांत मज विसरावें!
तु हसत मला फुलवावें
मीं नकळत आणि फुलावें!!

पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरि दाही!
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं!!

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

जीव भरुन पहावे तुला एकदा

जीव भरुन पहावे तुला एकदा
रानाच्या बरगड्यातून पळस पेटताना!
पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्या
शुभ्र शुभ्र कळ्या होताना!!

जीव भरुन पहावे तुला एकदा
अनिवार हाक प्राणात भरुन!
मोर अंधाराचा थुईथुई भिजताना
पिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन!!

जीव भरुन पहावे तुला एकदा
कळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी!
काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणे
मिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी!!

जीव भरुन पहावे तुला एकदा
जीव भरुन तुझे व्हावे एकदा!!

Thursday, April 12, 2007

आधी भरुन दिठीत ये

आधी भरुन दिठीत ये,
अंमळशाने मिठीत ये,
सोयिस्कर असेल तर:
मग आधी तसे असे.

भिंती वरती असतात पाली,
तू चल झाडाखाली:
किडमुंगी तिथे गावेल:
नको तेव्हा सुद्धा चावेल.
मला चावेल,
तुला चावेल.

आधी भरुन दिठीत ये,
अंमळ्शाने मिठीत ये.

मला काय हवे???
तुला काय हवे???
दोघांनाही ठाऊक आहे
तरी नजर भावुक आहे.
तुझी सोय,माझी सोय:
आता चटकन म्हण होय.
उघड्यावरच बरे प्रेम
पण तिथे लागेल नेम???
आणि नेम चुकला तर???
खेळ सगळा हुकला तर???

तर काय पायात पाय
पण शेवटी तेवढेच हवे:
त्याच्यासाठी शब्द नवे:

आधी भरुन दिठीत ये,
अंमळशाने मिठीत ये,
सोयिस्कर असेल तर:
मग आधी तसे असे.

Tuesday, April 10, 2007

हा दीप तमावर मात करी

अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

पुसुनि आसवे हसुनि जरा बघ
अनंत तार्याची वर झगमग
ये परत, परत ये तुझ्या घरी
अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

पिसाट वारे, वन वादळले
सूड घ्यावया जळ आदळले
ध्रुवतारा आहे अढळ तरी
अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

घावावचुन नसे देवपण
जळल्यावाचुन प्रकाश कोठुन?
कां सांग निराशा तुझ्या उरी?
अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


तुझी हाक तळ्यावरुन येते
वाऱ्याच्या मळ्यावरुन येते
थरारुन ऍकणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


मातीच्या ऒल्या ऒल्या वासात
वाऱ्याच्या खॊल खॊल श्वासात
झाडांचं भीजणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


फुलांचे वास वीरुन जातात
दीलेले श्वास सरुन जातात
असण्यांइतकचं नसणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण
चक्क मला म्हणाला:
"आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही !

पाच मुलं झाली तरी
प्रेमबी कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का ?
प्रेमाशिवाय अडलं का ? "

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हणलं :

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं मात्र 'सेम' नसतं !

तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने !
एक चोकलेट अर्ध अर्ध
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासनतास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

चिऊताई दार उघड

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !

गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .

कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .

तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .

दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !

फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .

चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .

तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

Tuesday, April 3, 2007

कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !

कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लू बाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !

पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

शतदा प्रेम करावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

जेव्हा तुझ्या बटांना

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

सावर रे

सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला!

आता आभाळ भेटले रे, अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला!

फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला!

जुने आधार तुटले रे, तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला!!

शब्द शब्द जपून ठेव

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी!

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे!
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी!!

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना!
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी!!

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची!
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी!!

लाजून हासणे अन

लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे

श्रावणात घन निळा बरसला

श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिम धारा
उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरिपसारा

जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगाच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी
निळया रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरु झाले
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारा

डोळयांमधले आसू पुसती

कधी बहर, कधी शिशीर, परंतू दोन्ही एक बहाणे
डोळयांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे

बहर धुंद वेलीवर यावा, हळूच लाजरा पक्षी गावा
आणि अचानक गळून पडावी, विखरुन सगळी पाने

भान विसरुनी मिठी जुळावी, पहाट कधी झाली न कळावी
भिन्न दिशांना झुरत फिरावे, नंतर दोन दिवाणे

हळूच फुलांच्या बिलगुन गाली, नाजूक गाणी कुणी गायिली
आता उरली आर्त विराणी, सूरच केविलवाणे

जुळली हृदये सूर ही जुळले, तुझे नि माझे गीत तरळले
व्याकुळ डोळे कातरवेळ, स्मरुन आता जाणे

धूके दाटलेले उदास उदास

धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास

दिवस तुझे हे फुलायचे

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे!

स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे!

मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे!

थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे!

माझ्या या घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे!!

भातुकलीच्या खेळामधली

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी

राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा
उद्या पहाटे, दुसरा वाहता, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी

तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे
का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी

का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना
वार्‍यावरती विरुन गेली, एक उदास विराणी

अशी पाखरे येती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती!
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती!!

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला!
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती!!

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले!
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती!!

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला!
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती!!

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी!
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती!!

असा बेभान हा वारा

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ

अखेरचे येतील माझ्या

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती