Wednesday, March 28, 2007

भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ॥धृ.॥

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची ॥१॥

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची ॥२॥

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची ॥३॥

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥

लाजून हासणे अन

लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे

शुक्रतारा

शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा

शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा

हात तुझा हातातुन

हात तुझा हातातुन धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा

रोजचेच हे वारे , रोजचेच तारे
भासते परी नवीन विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची भारिते जीवा

या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया
मोहरले ह्रुदय तसे मोहरली काया
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा

क्षणभर मिटले डोळे , सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे
आज फ़ुले प्राणातुन केशरी दिवा