Thursday, April 26, 2007

जगणे म्हणजे उधळित जाणे

जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

घनधारांतुन ख्याल ऐकतो रंगुनि मल्हाराचा
बघता बघता मोरपिसारा सार्या संसाराचा
मनात पाउस बरसे उधळित मातीचा मधुगंध
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

दुःखाला आधार नको का? तेहि कधितरी येते
दोस्त हौनी हातच माझा अपुल्या हाती घेते
जो जो येइल त्याचे स्वागत दार न कधिही बंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधि चंद्र होऊनी हासे
सर्वत्रच तो बघतो धुंदी डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

कधी कुणाचे आसू पुसता बोतंनी हळुवार
हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

Wednesday, April 18, 2007

खाली डोकं, वर पाय

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेबोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? ॥ १ ॥

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? ॥ २ ॥

भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील काय रे तीनदा? ॥ ३ ॥

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? ॥ ४ ॥

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


तुझी हाक तळ्यावरुन येते;
वाऱ्याच्या मळ्यावरुन येते;

थरारुन ऍकणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


मातीच्या ऒल्या ऒल्या वासात;
वाऱ्याच्या खॊल खॊल श्वासात;

झाडांचं भीजणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे


फुलांचे वास वीरुन जातात;
दीलेले श्वास सरुन जातात;

असण्यांइतकचं नसणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे

मी न घेतले, तरि मिळाले

मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये.

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती.
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

धूर...

अवतीभवती सतत जे घडतं आहे
त्याला वास्तव म्हणतात ;
ते बघून आपल्या आत जे घडतं
त्याला विस्तव म्हणतात !

विस्तव जर बाहेर पेटू शकला ,
तर निदान तो जाळून टाकील
बाहेरच्या वास्तवाची थोडीतरी घाण ;
पण विस्तव तर आतच धुमसतोय ,
आपल्यालाच हळूहळू गुदमरून टाकीत !

अशाही धुमसणाऱ्या परिस्थितीत
आपली धडपड
धूर बाहेर दिसू नये म्हणून !
धूर बाहेर दिसला तर
दांड्ग्यांच्या दहशतीचा धोका घेरील !
धूर न दिसू देणं
हेच लक्षण सुसंस्कृत असण्यचं
हे आता सगळ्यांनीच मान्य केलंय !

विस्तव आत धुमसतोय ,
श्वास धुराने घुसमटतोय ,
गुदमरत असताना एकच आशा धीर देतेय :
आतला विस्तव एक दिवस इतक पेतेल
की काही नाही तरी निदान
सुसंस्कृतपण आपलं त्यात जळून जाईल !