Tuesday, April 3, 2007

कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !

कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लू बाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !

पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

शतदा प्रेम करावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

जेव्हा तुझ्या बटांना

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

सावर रे

सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला!

आता आभाळ भेटले रे, अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला!

फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला!

जुने आधार तुटले रे, तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला!!

शब्द शब्द जपून ठेव

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी!

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे!
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी!!

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना!
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी!!

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची!
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी!!

लाजून हासणे अन

लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे

श्रावणात घन निळा बरसला

श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिम धारा
उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरिपसारा

जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगाच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी
निळया रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरु झाले
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारा