Tuesday, April 17, 2007

मी फूल तृणांतिल इवलें

जरि तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही!
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं!!

शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे!
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें!!

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें!
अन् स्वत:स विसरुन वारा
जोडील रेशमी नातें!!

कुरवाळित येतिल मजला
श्रावणांतल्या जळधारा!
सळसळून भिजलीं पानें
मज करितिल सजल इषारा!!

रे तुझियां सामर्थ्यानें
मीं कसें मला विसरावें?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें?

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा!
उधळित स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होऊनि ये तूं!
कधिं भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू!!

तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यांत मज विसरावें!
तु हसत मला फुलवावें
मीं नकळत आणि फुलावें!!

पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरि दाही!
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं!!

No comments: