ते किती लपवले तरिही
मज नकळत कळते कळते!
पाकळ्यात दडले तरिही
गन्धातून गूढ उकलते!!
मातीत गाढ निजलेले
जरि बीज न नयना दिसते!
घन वळता आषाढाचे
मज नवखी चाहूल येते!!
रात्रीच्या घन अन्धारी
जरि गहनच सगळे असते!
ते निःशब्दाचे कोडे
मज नक्शत्रान्तून सुटते!!
श्रावणात चित्रलिपीचे
जरि अर्थ न कळति पुरते!
तरि ऋतुचक्रापलिकडचे
प्राणात उमलते नाते!!
लहरीन्तून थरथरणार्या
जरि भुलवित फ़सवित पळते!
पावसात उत्तररात्री
मज अवचित लय उलगडते!!
प्रतिबिम्बच अस्फ़ुट नुसते
जरि शब्दातुन भिरभिरते!
मौनात परि ह्रदयीच्या
कधी पहाट होऊनी येते!!
दुरात पलीकडे जेव्हा
ह्ळू गगन धरेला मिळते!
ते अदभूत मज कळल्याची
वेदनाच नुसती उरते!!
ते किती लपवले तरिही
मज नकळत कळते कळते!
पाकळ्यात दडले तरिही
गन्धातून गूढ उकलते!!
Tuesday, April 17, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment