Tuesday, April 17, 2007

यांचं असं का होतं ते कळत नाही...

यांचं असं का होतं ते कळत नाही , किंवा यांना कळतं पण वळत नाही
निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार,
रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार!
त्याचं कौतुक नसतंच मुळी कधी यांच्यासाठी
यांच्यासाठी एकच असते कपाळाला आठी!
कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥१॥

मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होते!
वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो!!
यांचा धोशा सुरू असतो -अमकं खाऊ नका त्याने डोकं जडसं होतं
तमकं पिऊ नका त्याने पडसं होतं
कधीसुद्द्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥२॥


सगळे कसे बागेत व्यायाम करत बसणार?
किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार?
बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना!
गालाला गाल लावून गुलगुल करत असतंच ना!
असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच,
यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं,
पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं!!
या कूट कोड्याचं उत्तर कधीच सुटत नाही, यांचं असं का होतं कळत नाही॥३॥

कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच जागा ठरलेली, आणखी कुठे जाणार?!
कारण आणि परिणाम यांचं नातं ढळत नाही,
यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळत पण वळत नाही ॥४॥

No comments: